Friday, July 31, 2020

"मैं हूं ना इधर"

श्री स्वामी समर्थ,
मैं हूं ना इधर,
हम गया नही जिंदा है.......

"अशक्य ही शक्य करतील स्वामी" हे वाक्य बोलायला जितके सोपे आहे, तितकेच अनुभवायला कठीण जाते. कठीण यासाठी कारण, आपला आपल्याच स्वामींवर विश्वास नसतो पण ते प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतातच. तुमच्या - माझ्या अंतरंगात, ते भिनलेल्या नामात, शरीरातल्या रक्तात सळसळत वहात असतात. गरज असते ती त्यांचे अस्तित्व ओळखण्याची. या लॉकडाऊनच्या काळात  प्रत्येकाला स्वामींचा आलेला अनुभव हा पुढे एका अनुभूतीद्वारे मांडतोय हा खरा की खोटा हे तुमच्या अंतरंगातील स्वामींनाच विचारा, बाकी ज्यांना पटणार नाही त्यांनी गोष्ट म्हणून वाचून सोडून द्या कृपया वाद घालू नये ही विनंती.......

"श्री स्वामी समर्थ" म्हणा रे गड्यांनो स्वामी समर्थ म्हणा. 

 रस्त्याच्या कडेने जाताना सहज त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले, ती सावली त्याला त्याची वाटली नाही, त्याने मागे वळून पाहिले कोणीही नव्हते, हात-पाय हलवून पाहिले तरी तसेच भाव सावलीचे, काहीच उपयोग नाही पण ती सावली का कोण जाणे त्याची वाटत नव्हती, इतक्या वर्षात आज त्याला काहीतरी वेगळेपण जाणवत होते स्वतःच्याच सावलीमध्ये, तितक्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसले. मंदिराचे दार बंद होते त्याने बाहेरून निरखून पाहिले,  आणि तोंडातून शब्द फुटले स्वामी हो, अवधुता दिगंबराssss अहो काय ही अवस्था? कुठे आहेत तुम्ही? तुम्हालाही हा लॉकडाऊन सोसावा लागतोय? अहो तुमचे भक्त पोरके आहेत तुमच्या शिवाय, माय-बापा संपवा हा कोरोना. स्वामी हो दर्शनासाठी दार उघडा, आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या नयनांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

तो भानावर आला ते मोबाईलच्या रिंग मुळे... समोर बायको होती. "अहो ऐकलं का? TV वर बातमी आली आहे, आज रात्रीपासून लॉक-डाऊन संपले." त्याने तिथेच फोन cut केला आणि धाय मोकलून रडू लागला, स्वामी जर हे छोटेसे मागणे आज पुर्ण केले तर मग इतके दिवस कुठे होता हो?" त्याचे सहजच लक्ष त्याच्या सावलीकडे गेले, त्याची ती सावली त्याच्यापासून वेगळी होत होती, आता त्याला दोन सावल्या दिसू लागल्या एक ती जी त्याचीच होती जी तो इतकी वर्षे बघत असायचा, मग ती दुसरी जी त्याला समजली नाही आणि आता बाजूला झाली ती कोणाची? त्याला मागून आवाज आला, "मैं हूं ना इधर म्हणत......" हम गया नही जिंदा है |" त्याने मागे वळून पाहिले तर साक्षात स्वामी उभे होते, त्याचं अवसान गळलं, त्याने स्वतःला मोकळं केलं ते थेट स्वामींच्या चरणांवर.

स्वामींनी त्याला स्वतःच्या कवेत घेतले, त्याचे अश्रू पुसले, त्याला मंदिराच्या पायरीवर बसवले आणि समजावले. अरे इतके दिवस तुझ्या लक्षात आले नाही, मी तर कायम तुझ्या हृदयात बसतो ना? मग मी या देवळांमध्ये बंद कसा? मी तुझ्याबरोबर तुझी सावली होऊन फिरतोय, आठव ते सगळे दिवस जेव्हा तुला माझी खरी गरज होती, तिथे प्रत्येक वेळी मी कोणाच्या ना कोणाच्या रुपात तुला मदत केली....

स्वामीनामामध्ये गुंग रहात एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत स्वतःची व आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारा तो माधव फारच मेहनती होता. घरामध्ये माधव त्याची बायको आणि एक छोटे गोंडस बाळ असे सुखी कुटुंब होते, हसत खेळत त्यांचे दिवस जात होते आणि एक दिवस अचानक जगावर कोरोना महामारीचे संकट आले. छोट्याश्या घरात सर्वांना सांभाळत असताना घरात आहे त्या सामानामध्ये त्याने एक महिना काढला आणि त्यानंतर मात्र एक दिवस त्याला कंपनीच्या मॅनेजर चा फोन आला कंपनी बंद करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांनाच कामावरून कमी करण्यात आले आहे. माधव हडबडला... स्वामी हो त्याने स्वामींना हाक मारली. घरामध्ये जेमतेम 2 दिवसांचे जेवणाचे सामान आहे त्यापुढे काय? बाहेर ही महामारी सुरू आहे त्यामुळे बाहेर कामासाठी कुठे जाऊ शकत नाही. सर्वच बंद आहे, काय करायचं? तोंडाला कपडा बांधून तो तसाच बाहेर निघाला, बायकोला खोटेच सांगितले, जरा एकाला भेटायला जातोय बघतो सामानाची काही सोय होते का? बाहेर येऊन तो चालता चालता ढसाढसा रडला, त्याच अवस्थेत असताना एक हिरवी साडी नेसलेली बाई त्याच्या समोर आली आणि म्हणाली काय रे लेकरा, काय झालं रडायला, माधव ने सर्व परिस्थिती तिला सांगितली, त्यावर हसून ती त्याला म्हणाली अरे दादा त्या डाव्या गल्लीच्या उजव्या कोपऱ्यावर एक भला माणूस महिन्याभराचं सामान देतोय, जा तिकडे तुझी सोय होईल. उगाच इथे बसून रडू नको. ती लागलीच पुढे निघून गेली. तिच्या सांगण्यानुसार माधव त्या गल्लीत गेला आणि काय आश्चर्य खरंच एक मनुष्य तिथे शिधा वाटप करीत होता. त्याने माधवला स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला आणि काही लागलं तर कॉल करायला सांगितले. सामान मिळाल्याच्या आनंदात माधवने थेट घर गाठले, निदान पुढचे काही दिवस तरी त्यांना जेवणाची भ्रांत नव्हती. सोबतीला स्वामींचे नामस्मरण सतत त्याच्या मुखी होते.

पण प्रारब्ध कोणालाही चुकले नाही. एके रात्री त्याच्या वडिलांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.  एका दुसऱ्या घरी त्याचे आई-वडील स्वतंत्र रहात होते, म्हटलं तर दोघांच्या घरामध्ये अंतर खूपच होते. इतक्या रात्री बाहेर कसे जायचे? महाराज सांभाळा मला, योग्य ती तयारी करून तो घरातून निघाला. समोरून एक गाडी आली त्यातील ड्रायव्हर ने त्याला पत्ता विचारला, तो पत्ता नेमका माधवला जिथे जायचे होते तिथलाच होता, त्याने गाडीवाल्याला आहे ती परिस्थिती सांगितली, गाडीमध्ये बसायची सोय झाली आणि गाडी थेट त्याच्या आई वडिलांच्या घरापाशी आली. चेहऱ्यावर चादर झाकलेली, बाजूला आई रडत बसलेली पण महामारीमुळे तिथेही बंधन होते, तो आईला मिठी मारुन धड रडूही शकत नव्हता. एक डॉ काका होते त्याच्या परिचयाचे, त्या परिस्थितीत त्यांनी सर्वांना खबरदारीच्या सूचना केल्या. थोड्याच वेळात एम्ब्युलन्स आली. त्यातून काही माणसं PPE किट घालून खाली उतरली. त्याच्या बाबांना घेऊन गेले. तो मागून डॉ काकांसोबत त्यांच्या गाडीत होताच. गाडी म्युन्सीपालिटीच्या हॉस्पिटलमध्ये गेली तिथे डॉ काका सोबत होते. त्यांनी योग्य ती कागदपत्रे हाताळून, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, त्यांची NOC घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊन, माधवच्या वडिलांचे पार्थिव ताब्यात घेतले. शेवटचे दर्शन तेव्हाच झाले त्याला.....त्यांचा निपचित पडलेला पंधरा फटफटीत चेहरा पाहिला आणि तो तिथेच कोसळला. डॉ काकांनी त्याला सावरलं आणि सगळी रीतसर कारवाई करून पुन्हा अंत्यसंस्कार करायला स्मशानाच्या दिशेने निघाले. पार्थिव एम्ब्युलन्स मध्ये होते, शेवटचे चार खांदे देखील नशीबामध्ये नव्हते, अशा परिस्थितीत दाह संस्कार झाले आणि तो घरी आला. त्यानंतर दशक्रिया विधीपासून ते अगदी तेराव्याचे विधी होई पर्यंत डॉ काकांनी त्याची पाठ सोडली नाही. लागणारा सर्व खर्च त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून केला होता, हिशोबाचे नंतर बघू असे म्हणत तेराव्या दिवसानंतर काका मोकळे झाले.

दिवसामागून दिवस जात होते, काकांचे पैसे दिले तर पाहिजे पण नोकरी अभावी काहीच नव्हते, अशामध्येच लॉक- डाऊन हळूहळू शिथिल होत होते. माधव ने काम नव्याने शोधायला सुरुवात केली. त्याच वेळेस एक व्यक्ती त्याला भेटली, त्याने माधवला ओळखत असल्याचे सांगितले. माधव ने त्याच्याकडे नोकरीचा विषय काढला, तर त्या व्यक्तीने त्याला एक चांगली संधी दिली.  त्यांचे घाऊक सामानाचे दुकान होते, माधवने त्यांच्याकडून सकाळी ठराविक सामान न्यायचे त्याची विक्री करायची आणि संध्याकाळी राहिलेलं सामान व जमलेले पैसे त्यांच्याकडे सोपवायचे. नवीन दिवस नवीन सामान असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. सामानाची विक्री होत होती माधवचा पैशांचा प्रश्न सुटला होता. आणि एक दिवस माधव सहज म्हणून जो बाहेर निघाला तोच ही स्वामींच्या सावलीची घटना घडली......

स्वामी म्हणाले, आठवलं का सारे? ती हिरवी साडी नेसलेली बाई अन्नपूर्णेच्या रुपात मीच होतो. तो जेवणासाठी सामान देणारा मनुष्य आठवतोय का? आता आठव तो गाडीवाला. इतकंच काय पण तुझे वडील गेले तेव्हा सर्व कार्य यथाशक्ती पार पाडणारे तुझे ते डॉ काका पण मीच होतो. त्यानंतर तुझी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी संधी देणारा तो व्यापारी हि मीच होतो. मी या सर्व कालावधीत तुला सोडून कुठेही गेलो नव्हतो, तू घेत असलेल्या नामाला अगदी सावलीसारखा धरून होतो. मग सांग बरं मी तुझ्या अंतःकरणात असताना तू बाह्य जगात मला का बरे शोधतोस????

 स्वामी हो चुकलो माफ करा, असे बोलून माधवने स्वामींचे पाय धरले. त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा प्रेमळ हात ठेवून महाराज पुन्हा त्याच्यातच सामावले अगदी तसेच जसे आतापर्यंत सोबत होते.


घरी येऊन माधवने या जेवणाचे सामान देणाऱ्या व्यक्तीला कॉल केला, तर समोरून उत्तर आले "This number is does not exist." तो डॉ काकांच्या घरी गेला तिथे टाळे होते. शेजाऱ्यांकडून समजले, लॉकडाऊन पूर्वी काका लेकीकडे अमेरिकेत गेले ते परत आलेलेच नाहीत. त्या व्यापाऱ्याला भेटायला गेला तर ते दुकान तिथे नव्हतेच त्या जागेवर स्वामींचे छोटे मंदिर होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार जेव्हापासून त्यांची दुकाने आहेत तेव्हापासून तिथे स्वामींचेच मंदिर आहे (अंदाजे 15 वर्षे). त्या जागेवर कोणतेही दुकान नव्हते.
आता मात्र माधवला खात्री झाली होती महाराज कायम आपल्या पाठीशी सावली बनून उभे आहेत. त्यांना आपण इतरत्र शोधायची गरज नाही. ते कायम आपल्या सोबत आहेत...
"मैं हूं ना इधर" म्हणत......

आपल्या प्रत्येकाला महाराजांचे काही ना काही अनुभव येतातच. या महामारीच्या काळात त्यांनीच आपली काळजी घेतली आहे, त्यांनीच आपला सांभाळ केला आहे. फक्त नामस्मरण करण्यामध्ये खंड पडू देऊ नये ही विनंती.

श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.......

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
©श्री रितेश वेदपाठक.
7972033197
8421132224