रामा एक प्रश्न....
सगुणातून निर्गुणाकडे जाण्याच्या प्रयत्नातील पायऱ्यांबद्दल थोडे सांगावे?
श्री स्वामी समर्थ,
सगुण उपासना म्हणजे, आपल्याला हव्या असलेल्या रूपामध्ये आपण आपल्या देवांना सजवणे, आपले मन हे त्याच्या भजनात - नामात तल्लीन करणे, तो समोर प्रत्यक्षात आहे, समोर एखादे आपल्या आवडीचे त्याचे रूप आहे. ही भावना म्हणजेच सगुण उपासना.
याउलट देवाच्या स्वरुपात आपली वृत्ती व आपले सर्वस्व विसरून जाणे, मी तू पणाची बोलवण करून तो भेदच नाहिसा करुन वृत्ती-शून्य अवस्था प्राप्त करणे, यालाच निर्गुण उपासना म्हणतात.
सगुण उपासनेतून निर्गुण उपासनेकडे जाताना, देह - बुद्धीचा त्याग करावा लागतो. त्यामुळे चित्त स्थिर होण्यासाठी अखंड नामाचा निर्गुण झरा अंतरंगातून वहावा लागतो, आपल्या समोर कोणीही दैवत नाही, आहे ती फक्त एक सद्गुरूंची शक्ती, त्यांचे प्रेम त्यांचे नाम, हे ध्यानात ठेवून, त्यांची शिकवण सांभाळीत, व नामात झिजलेल्या देहा पलीकडे ध्यान अवस्थेत स्वतःला सद्गुरूंच्या चरणी ठेवून, निरंतर त्या नामाच्या अस्वस्थेत वैराग्ययुक्त होऊन, विशयासक्ती स्वतः पासून दूर टाकून व कर्माचा अभिमान न बाळगता सर्व कर्म सद्गुरूंच्या चरणी अर्पून जी भावना असते तीच निर्गुणाची भावना होय.
मनुष्याचे जीवन क्षणभंगुर आहे, म्हणूनच अहम ब्रम्हास्मी, या वचनावर ठाम राहून, उदार वृत्तीने नामाच्या पाठीमागे लागले व अनंत कालातील त्या शक्तीला आपल्या अंतरंगात विराजमान केले की कोणता भेदच रहात नाही, तुम्ही स्वतःच एक शक्तिमध्ये रूपांतरित होत जाता, तुम्ही जी अंघोळ करता तीच देवाची आंघोळ,
तुम्ही जे खाता तोच तुमचा नैवेद्य असतो, तुम्ही जे जगता तेच त्यांचे जगणे, त्या देवाचे वेड लागणे व स्वतः त्या देवाचे होऊन जाणे, म्हणजेच निर्गुण अवस्था होय, तहान,भूक हरपून नामात असताना देवाने म्हणजेच निर्गुण शक्तीने तुम्हालाच निर्गुण केले यापेक्षा मोठे पुण्य ते काय? जेव्हा गुरू शिष्यामध्ये विलीन होतो, शिष्य गुरुमध्ये विलीन होतो, आणि नंतर त्यांचे नाम परमात्म्यामध्ये विलीन होते तेव्हा उरते ते फक्त नाम.....
सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारे सद्गुरू आणि त्यांचे नाम.....
श्री स्वामी समर्थ
श्री राम समर्थ...
तुमचा,
स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश वेदपाठक.