Tuesday, March 24, 2020

मानसपूजा

श्री स्वामी समर्थ,
||जाते जाते बोले स्वामी,
हम गया नही जिंदा है.||

स्वामींनी जर स्वतःच सांगितले आहे की मी इथेच आहे मग आपण का  शोध घेत फिरतोय त्यांचा? ते आपल्यातच आहेत. "मुझे वही जानता है जो खुद को समझता है." शंकर बाबा नेहमी हेच म्हणतात ना? मग ओळखायला शिका स्वतःला. "मुझे तेरे हृदय में देखने की कोशीश कर मे सदा तेरे साथ हूं" हे वाक्य तर गिरनार वारी करून आल्यावर जो तिथून प्रसाद मिळतो त्या धुनीच्या फोटोवर लिहीलेलंच आहे. हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की आपण सध्या कोरोनाच्या प्रभावामुळे स्वतःच्याच घरामध्ये बंदिस्त आहोत लोकांचा वेळ जात नाही आहे म्हणे. पण मग हा वेळ जातोय कुठे? काहीतरी करण्यात वेळ दवडण्यापेक्षा नामस्मरण करण्यात सत्कारणी लावा की ही वेळ, नाहीतरी अशी संधी पुन्हा मिळणे नाही. घराबाहेर येऊन संसर्ग लागण करून घेण्यापेक्षा नामामध्ये दंग होऊन नामाची लागण केव्हाही चांगलीच नाही का?

२६ मार्चला स्वामी समर्थांचा प्रकटदिन आहे, तेव्हा कोणत्याही मठामध्ये जाता येणार नाही ही खंत जर असेल तर साधी सरळ उपासना आहे ती करा , त्यात जो आनंद मिळेल, अनुभव मिळेल तो नंतर मला नक्की कळवा, मानसपूजा हा सर्वोत्तम उपाय आहे, मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा(मानसिक पूजा) केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व हळूहळू साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.

"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.

येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु राम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.
 "साधक स्वामींचा" (रितेश वेदपाठक लिखीत)या पुस्तकामध्ये मानस पूजेमधून मिळालेली पोचपावती मी आधीच सर्वांना दिलेली आहे. साधक कोण? हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे, त्यापेक्षा आपण या पुस्तकामधून साधना कशी शिकूया याचा विचार करावा, मानसपूजेमध्ये  साधकाने कायकाय व कसे प्राप्त केले याचे वर्णन साधक स्वामींचा पुस्तकात आहेच. आपण देखील मानसपूजेद्वारे आपली साधना वाढवूया, प्रत्येकाचे नामस्मरण वाढावे व येणाऱ्या काळातील (घोरकलीयुगातील) संकटांना मात देण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता वाढावी यासाठी मी नेहमीच प्रत्यनशील आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वामींच्या प्रकटदिनी मानसपूजेद्वारे स्वामींना साकडे घालून आपल्या वरील आलेल्या विपत्तीतून लवकर बाहेर काढण्यासाठी महाराजांना प्रार्थना करूया.

सर्वांनी आपल्या घरातच राहून मानसपूजेद्वारे महाराजांचा प्रकटदिनाचा सोहळा साजरा करूया.

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश वेदपाठक.
७९७२०३३१९७
८४२११३२२२४

Wednesday, March 18, 2020

चला घोरकष्टोधरण स्तोत्र वाचन करूया

श्री स्वामी समर्थ
ज्याच्या झोळीमध्ये जितकी जागा असते तितकीच वस्तू त्याच्या झोळीत भरते, जर एखाद्याला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त मिळाले तर तो त्याचा दुरूपयोग करतो. चीन कडून सुरुवात झालेला आणि समस्त सृष्टीला भयंकर अशा संकटात त्रास भोगायला लावणारा करोना आजार त्यातीलच एक.

अशा या विपत्तीतून बाहेर येण्यासाठीच वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांनी "घोरकष्टोधरण
"  स्तोत्राची रचना केलेली आहे, कितीही मोठे संकट असो या स्तोत्राच्या पठणाने त्याचे निवारण नक्की होते. चला तर मग आपण देखील work from home करूया, संकल्प पूर्वक स्तोत्र पठण करूया:-
आपल्या गुरूंचे स्मरण करून (ज्यांचे सदेह गुरू नाहीत त्यांनी दत्त महाराजांचे स्मरण करावे) पुढील संकल्प करावा.
संकल्प:- हे भगवान हे भगवती समस्त सृष्टीचे रचयेता या करोना नावाच्या व्याधी पासून समस्त सृष्टीचे रक्षण करा, दया करा, धर्म आणि सत्याचा जो नाश होत आहे, त्यामुळे विविध व्याधी-त्रासाने समस्त सृष्टी त्रस्त आहे, त्या सर्व व्याधींपासून आमचे सर्वांचे रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा.

आम्ही "घोरकष्टोधरण" ह्या स्तोत्राचा पाठ वेळा करण्याचा संकल्प समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी, संपूर्ण मानव जातीच्या रक्षणाकरता करीत आहोत, या महाभयंकर विपदेपासून संपूर्ण भूलोकाचे निवारण करा, सर्वांचे रक्षण करा, सर्वांची रक्षा करा.

संकल्प करून झाल्यावर किमान  माळ (१०८ वेळा) तुमचा मंत्र (मंत्र माहीत नसल्यास श्री स्वामी समर्थ) जप करावा आणि नंतरच स्तोत्रास आरंभ करावा.

||घोरकष्टोधरणस्तोत्रम ||

श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।।

त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।।
त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते ।घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।।

पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । 
भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।।
त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।
 त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।।

धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् । सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।
भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५॥
श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥

इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज विरचितं घोरकष्टोधरणस्तोत्रम सम्पूर्णम् ।।

घोरकष्टोधरणस्तोत्रम अर्थ

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मां पाहि देवाधिदेव |
भावग्राह्यक्लेश हरिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||१||

अर्थ:- हे देवाधिदेवा! श्रीपाद श्रीवल्लभा! तू नित्य निराकार निर्विकार आहेस. तूच स्वयं श्री दत्तात्रेयांचा स्वरूप आहेस. आमच्या प्रार्थनेला तू फलद्रूप करून आपल्या शरणात घे आणि आमचे रक्षण कर. आमचे सर्व प्रकारचे दुःख, क्लेश यांचा तू हरण कर आम्ही तुझी भक्ती करतो. तुझे सुंदर नामाचे गुणगान करतो, कीर्तन करतो. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

त्वंनोमाता त्वंपिता आप्तोधिपस्त्वम् त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् |
त्वम् सर्वस्वम् नोप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||२||

अर्थ:- तु माता, तूच पिता, आप्त बन्धु भ्राता आहेस. हे सद्गुरु, तूच त्राता आहेस, अर्थात आम्हाला या अघोर क्लेशतून काढणारा आहेस, तूच आमचे योगक्षेम चालवणारा आहेस.
तुझ्याविना कोणीच आमच नाही, तुच सर्वस्व आहेस. हे विश्व तुझ्याच रूपाने विनटले आहे. हे त्रिविक्रम भारती ला विश्वरूप दाखवणार्या श्रीदत्ता, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यम् |
त्रातारंनो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||३||

अर्थ:- हे ईश्वरा, तूच आमचे पाप, ताप हरण करणारा आहेस. तूच सर्व व्याधी, दैन्य, दुःख, दारिद्र्य निवारण करणारा आहेस. या जन्म मरणाच्या च्या भीती आणि क्लेशातून मुक्त करणारा तूच आहेस तुझ्या शिवाय दुसरा कोणीच हे करू शकत नाही तूच सद्गुरू आहेस. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

नान्यस्त्राता नापिदातानभर्ता त्वत्तोदेवत्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||४||

अर्थ:- हे सद्गुरो ! तुझ्या शिवाय आम्हाला तारणारा कोणी नाही. आम्हाला देणारा आणि आमच भरण पोषण करणारा पण तुझ्या शिवाय कोणी नाही. तेव्हां, हे सद्गुरू, आम्ही तुला अनन्य शरण आलो आहे कारण तूच आमचा देव आहेस. हे आत्रेया (अत्रिपुत्रा) आमच्या वर अनुग्रह कर, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं |
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||

अर्थ:-  हे अखिलान्दमूर्ते! तुच जगातल्या सगळ्या आनंदाची साक्षात मूर्ती आहेस. आम्हाला धर्मावर प्रीती दे, सन्मती आणि तुझी अर्थातच देवाची भक्ती दे. हे देवा, आम्हाला सत्संग अर्थातच चांगल्या लोकांचा साथ दे, जगातले भोग भोगून आम्हाला मुक्ती दे. तुझ्या चरणी आमचा सतत भाव असो हीच आसक्ती दे. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमंगलवर्धनं | प्रपठेन्नियतोभक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत् ||

अर्थ:- वरील पाच श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत. तसेच, जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्ती ने पठाण करेल, तो श्रीदत्ता ला प्रिय होईल.

चला तर मग एक छोटासा प्रयत्न तर करू, बाकी कार्य सिद्धीस नेण्यास स्वामी समर्थ आहेतच.

नाम घे तू मुखी नाम घे रे,
स्वामी तुमच्या सदैव पाठीशी रे.
भय नको बाळगू तू नाम बाळग,
आळव स्वामींना भक्ता आर्त आळव.

स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश वेदपाठक.